मी अजूनही तसाच आहे.
बहुधा ७ वर्षांचा असेन मी. शाळेला सुट्टी लागली कि गावी जाण्याचा कार्यक्रम ठरलेला. सगळ्या नातेवाईकांची, भावंडांची आणि गावच्या सवंगड्यांची भेट होणार, स्वच्छ आणि मोकळ्या हवेत भरपूर हुंदडायला मिळणार, आणि वेळेचं बंधन न राखता भरपूर खेळायला मिळणार, म्हणून आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीची नेहमीच आतुरतेने वाट पाहायचो.
त्या वर्षी शाळेला सुट्टी लागल्यावर सुभाषमामांनी आम्हाला श्रीवर्धनला घेऊन जायचं ठरवलं. मामा एस.टी मध्ये कंडक्टर होते. मामांबरोबर एस.टी.त जाणं म्हणजे मोठी पर्वणीच! ४०-५० लोकांना एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी व्यवथितपणे आणि वेळेवर नेण्याची जबाबदारी, म्हणजे काही साधी गोष्ट नाही. त्यांनी मारलेल्या घंटीच्या इशाऱ्यावर इतकी मोठी गाडी निघते आणि थांबते, हे माझ्यासाठी अप्रूपच होतं. त्या वेळी मामा म्हणजे खरंच सुपरमॅन वाटायचे!
एस.टी डेपोमध्ये आणि स्टेशनवर मामांच्या ओळखीचे बरेच लोकं असायचे. त्या सर्वांकडून “मुंबईची भाचे कंपनी” म्हणून आम्हाला नेहमी स्पेशल ट्रीटमेंट मिळायची. गाडी डेपोमध्ये तयार झाल्यावर सर्वात पहिल्यांदा आत बसणे, घंटी वाजवणे, ड्रायव्हरच्या सीटवर बसून गाडी चालवण्याची नक्कल करणे, गाडीच्या मागेअसलेल्या शिडीवर चढून वर टपावर जाणे, या सर्वांची मुभा होती. अर्थात यावर मामांची आणि त्यांच्या सहकाऱ्यांची काळजीपूर्वक नजर असायची.
प्रवासादरम्यानची मजाही आगळीच. कुठल्या सीटवर रिझर्वेशन नाही ते मामांना माहिती असल्याने, उरलेल्या सीटपैकी सर्वात चांगली सीट आम्हाला मिळायची. बऱ्याच वेळा ड्रायव्हरच्या मागेअसणाऱ्या सीटवरच आमचा नंबर लागायचा. तिथून ड्रायव्हरचं गाडी चालवण्याचं कौशल्य अगदी जवळून पाहायला मिळायचं. मीपण त्यांची प्रत्येक हालचाल अगदी उत्सुकतेने बघायचो. ती आवड बघून काही वेळा ड्रायव्हरमामा आम्हाला सीट ओलांडून गियरबॉक्सच्या शेजारी असणाऱ्या लाकडी बॉक्सवर बसायला बोलवायचे. तिथे बसल्यावर अगदी विमानाच्या कॉकपीटमध्ये बसल्याचा आनंद व्हायचा. तिथून दृष्टीक्षेपात येणारा देखावा एका लहान मुलाच्या नजरेतून पाहिला तरच त्यातला “अगा मी ब्रह्म पाहिले” चा भाव कळेल!
काही वेळा मामा मागे दाराजवळ असणाऱ्या त्यांच्या किंवा त्यांच्या बाजूच्या सीटवर बसायला बोलवायचे. तिथून माझं कंडक्टरच्या कलाकौशल्याचं निरीक्षण चालायचं! गाडी वेळेवर सोडणे, एका हाताने मागचं दार उघडणे, बंद करणे, लॉक करणे, चालत्या गाडीत तोल सांभाळत तिकिटं देणे, काळजीपूर्वक पैशाचा हिशोब लावणे, सुट्ट्या पैशावरून हुज्जत घालणाऱ्या प्रवाशांना गोडीगुलाबीने शांत करणे, कोण कुठल्या स्थानकावर उतरणार आहे हे नीट लक्षात ठेवून, गरज पडल्यास त्यांना आठवण करून देणे, समोरून येणाऱ्या एस.टी.तील ओळखीच्या सहकर्मचाऱ्यांना त्यांच्या घरून दिलेला निरोप किंवा जेवणाचा डबा देणे, हे सर्व जवळून बघताना चांगलीच करमणूक व्हायची. मामा अगदी सराईतपणे या सर्व गोष्टी करताना बघून नवलही वाटायचं.
त्यामुळे मामा आम्हाला श्रीवर्धनला घेऊन जाणार हे ऐकल्यावर मी अगदी आनंदात होतो! आई, दादा, आप्पा, ताई आणि मामा यांच्या सोबत ३-४ दिवस नवीन ठिकाणी फिरण्यासाठी मी उत्सुक होतो. गाडी संध्याकाळची. बॅगा भरून झाल्या. मामांबरोबर आम्ही पाचही जणं मुंबई सेंट्रलला पोहोचलो. नेहमीप्रमाणे मामांनी रिझर्वेशन नसलेल्या सीट कुठल्या ते सांगितलं. त्यातील गाडीच्या पुढच्या बाजूस असणाऱ्या सीटवर मोक्याच्या खिडक्या पकडून आम्ही बसलो. दादा आणि मामांनी आमच्या बॅगा गाडीत व्यवस्थित ठेवल्या. तिकिटं काढली. गाडी सुटायला अजून काही वेळ होता. मोकळ्या वेळेत खिडकीच्या काचा वर-खाली कर, घंटीच्या दोरीशी छेडछाड कर, अशा माझ्या काहीतरी उचापत्या चालू होत्या. हळूहळू इतर प्रवासी येऊ लागले. मामांनी सांगितलं होतं कि सुट्ट्या चालू झाल्यामुळे गाडी पूर्ण भरण्याची शक्यता आहे म्हणून. जशी गाडी भरू लागली तसं मामांनी आम्हाला जागेवर बसायला सांगितलं. खिडकीतून बाहेर बघत आता गाडी कधी निघते याची मी वाट पाहू लागलो.
तेवढ्यात मला दादा गाडीच्या बाहेर दिसले. माझ्या नकळत ते खाली उतरले होते. मला वाटलं काही खायला किंवा पाणी घ्यायला उतरले असावेत. सामान घेऊन चढतील लवकरच. काही मिनिटं तशीच गेली. गाडी जवळ-जवळ भरत आली होती. आता मात्र मला काळजी वाटू लागली, दादा अजून गाडीत का बसत नाहीत? पाठी वळून बघितलं तर मामा दार बंद करून बेल मारण्याच्या तयारीत. बाहेर बघितलंतर अवघडलेल्या चेहऱ्याने दादा हात हलवून निरोप देत होते. त्याक्षणी माझ्या पोटात धस्स झालं. काय घडतंय हे?
मी आईला विचारलं, तर आईने मला जवळ घेतलं आणि म्हणाली, “अरे, आपणच जाणार आहोत श्रीवर्धनला. हे नाही येणार”. तिचं वाक्य पूर्ण होण्याच्या आधीच माझ्या डोळ्यात टचकन पाणी आलं .“का नाही येणार दादा आपल्याबरोबर? ते फक्त सोडायला आले आहेत का? मला सांगितलं का नाही आधी?” माझ्या प्रश्नांची सरबत्ती चालू झाली. हे सगळंच अनपेक्षित होतं. काहीही झालं तरी दादांना सोडून मला कुठेच जायचं नव्हतं. बालमनाच्या हट्टाने आणि दादांपासून दूर होणार या विचाराने दुःखाचा आवेग अनावर झाला. नकळतच डोळ्यातून गंगाजमुना वाहू लागल्या. आई समजावण्याचा प्रयत्न करत होती, पण मी काहीच ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हतो. खिडकीतून हात बाहेर काढून मी दादांच्या नावाने टाहो फोडला. आई, आप्पा, ताई मला शांत करू लागले तसा मी अजूनही हात-पाय मारू लागलो. हट्टाला पेटलेल्या ७ वर्षांच्या मुलाला कसला आला आहे विधिनिषेध? दुःख व्यक्त करता येत नव्हतं म्हणून त्याचं रूपांतर रागात झालं. “दादा येणार नाहीत, तर मलाही श्रीवर्धनला जायचं नाही. मी चाललो दादांकडे” असं ओरडत सर्वांना झिडकारून मी गाडीच्या दाराकडे धाव घेतली. पडून लागेल म्हणून काही प्रवाशांनी मला सावरण्याचा प्रयत्न केला. त्यांनाही झिडकारत मी दाराजवळ पोचलो. शेवटी मामांनी मला अडवलं आणि समजावू लागले. भर गाडीत मी घातलेल्या गोंधळामुळे घरातील सर्वांचीच अवस्था बिकट झाली. बाहेर दादांना काय वाटलं असेल? आता या मुलाची समजूत कशी घालायची?
गाडीची वेळ होऊन गेली. बऱ्याच प्रवाशांना सहानुभूती होती, पण त्यातले काही साहजिकच गाडीला उशीर होत असल्याने अस्वस्थ झाले. दादा येणार नाहीत हे आई, आप्पा, ताई, मामा यांना माहित होतं. इतकंच नव्हे तर गाडीतल्या सर्वांनाही ते कळून चुकलं होतं. मग मलाच कोणी का सांगितलं नाही? अखेर, मला जाणीव झाली कि काही दिवस तरी मला दादांशिवाय राहावं लागणार. ती कल्पनाच असह्य, आणि आता तर अचानकपणे ती परिस्थिती सामोरी आली होती.
लहानपणापासून मी दादांच्या खूप जवळ. दादांचा हात धरूनच मी सगळीकडे फिरत असे. अगदी १०-१२ वर्षांचा असेपर्यंत मी दादांच्याच ताटात जेवायला बसे. शाळा सुरु व्हायच्या आधी पुढल्या वर्षीची पुस्तक, व्यवसाय आणणे, नवीन पुस्तकांना कव्हर घालणे, पुस्तकं आवडीने वाचणे, उन्हाळ्याच्या सुट्टीतच व्यवसायातील अर्ध्याअधिक प्रश्नांची उत्तर लिहिणे, हे सर्व आमच्या दोघांच्या आवडीचं. दादांना आवडतं त्यामुळे मला अजूनही हुरूप यायचा. शाळेचा अभ्यास, सचोटी, मेहनत, वक्तशीरपणा यावर दादांचा खूप भर. कधीकधी ताई आणि आप्पाकडून काही चुका झाल्या कि त्यांना बोलणी बसायची. लहान असल्यामुळे “पुढच्याला ठेच, मागचा शहाणा” या म्हणीप्रमाणे मी दादांनी काही सांगण्याच्या आधीच अभ्यास करून ठेवलेला असायचा. त्यात दादांबद्दल भीती तिळमात्र नव्हती. होता तो फक्त आदर. दादा सांगतात म्हणजे आपल्या भल्याचंच असणार, त्यामुळे न सांगता त्यांना जे आवडेल तसंच मी करायचो. दादा माझ्यावर ओरडले किंवा नाराज झाले असा एकही प्रसंग मला आठवत नाही.
मला सीटवर बसवून अखेर मामांनी बेल मारली. भरलेल्या डोळ्यांनी पुन्हा एकदा मी दादांना बघितलं. गाडी निघाली. दादांशी ताटातूट झाली. ओरडून ओरडून घसा बसला. दुःख, राग, वेदना या भावनावेगाने पुरता हतबल झालो मी. घरचे सांत्वन करायचा प्रयत्न करत होते, पण मला कोणीच नको होतं. मायेची कूस, सहानुभूतीचा खांदा, डोक्यावर फिरणारा प्रेमळ हात, काही काही नको होतं. एकटाच बसून रडण्याशिवाय काहीच करू शकलो नाही मी. तशातच आईने जवळ घेतलं. गालांवरील अश्रू पुसले. मनात वेदना तशाच होत्या. त्या अवस्थेत रात्री कधीतरी झोप लागली.
सकाळी श्रीवर्धनला पोहोचलो. मामांनी आम्हाला बऱ्याच ठिकाणी फिरवलं. तिथल्या खूपशा आठवणी आता धूसर झाल्या आहेत. नारळाच्या झाडांनी नटलेल्या वाड्या, लाल कौलांची घरं, शेणाने सारवलेली अंगणं, अथांग समुद्र अशा काही गोष्टी पुसटशा आठवतात. त्यातल्या त्यात तिथला एक समुद्री कट्टा चांगलाच आठवतो. त्या कट्ट्यावर भल्यामोठ्या काळ्याशार खडकांची निमुळती होत जाणारी उतरंड होती. तिथून सुसाट वेगाने आवाज करत समुद्राच्या फेसाळलेल्या लाटा उफाळून वर यायच्या! अखंडपणे, एकामागोमाग एक. लाटा इतक्या जोरात आदळायच्या कि त्यांपासून उडणारे पाण्याचे तुषार अगदी ४०-५० फूट वर उसळून आमच्या अंगावर पडायचे! म्हटलं तर ते साधं पाणीच. पण पाण्यातही किती ताकद असते. अविरतपणे लाटांच्या रूपाने अवाढव्य खडकांनाही भेगा पाडण्याची शक्ती असते त्याच पाण्यामध्ये! ते दृश्य मन:पटलावर अगदी कायमच कोरलं गेलं. निसर्गाच्या सानिध्यात श्रीवर्धनमधील दिवस मजेत गेले.

त्या घटनेला चाळीस-एक वर्ष उलटून गेली. श्रीवर्धन म्हटलं कि अजनूही मुंबई सेंट्रल एस.टी स्टॅन्डवरील तो हृदयद्रावक प्रसंग आणि समुद्री कट्टा आठवतो. नकळत कंठ दाटून येतो आणि डोळे पाणावतात. चार वर्षांपूर्वी दादा श्रीरामचरणी लीन झाले. देहरूपाने कायमचे काळाच्या पडद्याआड गेले. आयुष्यात कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली. स्वतः ज्ञानेश्वरी आत्मसात करून, त्यातील आदर्शांनुसार जगून, दादांनी मला ज्ञानेश्वरीरूपी अध्यात्मभांडाराच्या शाळेत सोडलं.
दादांपासून मिळणारी प्रेरणा आणि आशीर्वाद अदृश्य स्वरूपात सदोदित आमच्यासोबत आहे याची खात्री असूनसुद्धा, त्यांच्यापासून होणाऱ्या ताटातुटीच्या वेदना, श्रीवर्धनच्या खडकाळ कट्टयावर आपटणाऱ्या लाटांसारख्याच मनावर सतत आघात करतात. समुद्राच्या लाटांना कसं थांबवायचं? भेगा पडणाऱ्या खडकांना कसं सावरायचं?
या कालखंडात आयुष्यात बरीच स्थित्यंतर घडली. मी मात्र अजूनही तसाच आहे.